जोहार
जोहार मायबाप जोहार । कायापूर शहर तेथील मी महार । पाहूं आलों दरबार । धन्याचा की जी मायबाप ॥ १ ॥
पाटील जिवाजी अवधारी । जो कां ग्रामींचा सत्ताधारी । परि दिवसाच करितो चोरी की जी मायबाप ॥ २ ॥
आशा पाटलीण तोंडाळु फार । उगीच फिरती दारोदार । सांगे अक्षयासी व्यवहार । फजितखोर की जी मायबाप ॥ ३ ॥
मनाजीपंत कुळकर्णी । त्याचे हातीं खत लेखणी । त्याची जैशी जैशी करणी । तिकडे तिकडे कुळें जाती की जी मायबाप ॥ ४ ॥
यमाजी बाबा हुजूरच महालदार । त्याचे जिवावरील महार । त्यासी नाही पडला व्यवहार । दरबार शुद्ध करावा की जी मायबाप ॥ ५ ॥
मग जिवाजी राहाविलें । मूळच्या शिवाजीस आणविलें । पाटीलकीचें वस्त्र दान दिधलें । ग्राम त्याजकडे लाविला की जी मायबाप ॥ ६ ॥
तेथील सांडबुद्धि वाटली भली । गांवामध्यें अक्षय नांदविली । नित्य नेहमीं बोलती जहाली ।
खरी केली हांक देऊनि की जी मायबाप ॥ ७ ॥
मज महाराची महारकी । फिरती असे अनेकी । एका जनार्दनीं लौकिकीं । दिला पोषाख युदुवीरें की जी मायबाप ॥ ८ ॥