व्यापार
त्रैलोक्याचा स्वामी जनार्दना । केला व्यापार ह्यापासून ॥ १ ॥
मोठा लागला व्यापार । रामनाम निरंतर ॥ २ ॥
सोहं कर्जखत दिधलें । तें म्यां मस्तकीं वंदिलें ॥ ३ ॥
महा प्रेमाची लुगडीं दिधलीं । निजमुक्तपणें प्राप्त झालीं ॥ ४ ॥
अनुभवाची तहसील समस्त । स्वामीस करुणा पाठविली रिस्त ॥ ५ ॥
धर्म खर्डा जमा । खर्चीं घातलें पूर्वकर्मा ॥ ६ ॥
संतांसंगें वसूल बाकी । भक्ताहूनि अति नेटकी ॥ ७ ॥
कैवल्यपुरीं बांधलें तोरण । चैतन्य चावडी बैसलों जाण ॥ ८ ॥
ऐसा व्यापार सिद्ध झाला । एका जनार्दनीं केला ॥ ९ ॥