जोहार
जोहार मायबाप जोहार । मी अविद्या नगरीं महार साचार । माझ्यानें हे नगर । आकारासी आले की जी मायबाप ॥ १ ॥
नगर तें रचिलें ब्रह्मियाने । आंत घर दिधलें बांधून । काम सांगितलें त्यांने । तेंच करीत आहे की० ॥ २ ॥
म्यां साहा चाकर ठेविले । ते माझ्या बळां वर्तती वहिले । मला गांजिती बळें । अन्याय नसतां की० ॥ ३ ॥
तुम्ही अवघे एकत्र जाहलां । माझें घर मोडावयाचा मनसोबा केला । जरी माझें अगत्य असेल धन्याला । तरीच मजला ठेवील की० ॥ ४ ॥
आतां कलियुगाचे ठायीं । मी माझें वसे सर्वांचे ह्रदयीं । माझें काम क्रोधाचे ठायीं । माझें मजपाशींच की० ॥ ५ ॥
त्यामाजीं संत सज्जन । रूपीं मिळाले परिपूर्ण । तें मानस मनरंजन । भक्त म्हणोनी की० ॥ ६ ॥
एका जनार्दनीं म्हणे देवा । अविद्येचा संग मज नसावां । जन्ममरणाचा ठेवा । तोडून टाकावा की जी मायबाप ॥ ७ ॥